बैल पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण असतो. या दिवशी शेतकऱ्याचा साथीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाला सजवले जाते. बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढण्यात येते. मात्र, यंदा सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही सण-उत्सव हे गर्दी न करता शक्यतो घरच्याघरी साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे यंदाचा सणही महाराष्ट्रात काही ठिकाणी साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यात आला आहे.
शिर्डी (अहमदनगर) - आज बैलपोळा हा सण मोठ्या थाटामाटात राज्यभरात साजरा करण्यात येते. साई मंदिरातही हा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आहे. साईबाबांचा दुपारच्या मध्यान्ह आरतीनंतर साईबाबांचा समाधी समोर बैलांच्या जोडीची मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर साई मंदिरातील पुजाऱ्याकडून यांची विधिवत पूजा करण्यात आली आहे.
पंढरपूर (सोलापूर) - बैल पोळ्याच्या दिवशी सकाळपासून आपल्या बैलाला आंघोळ घालून बैलाला सजवण्यात शेतकरी व्यस्त होता. पंढरपूरसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भंडारा - शेतकऱ्यांचा सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या बैल पोळा सणा कोरोनाचा सावट पाहायला मिळाले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश पारित करत पोळा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पोळा अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा लागला.
अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सुचनांचे पालन करत येरड बाजार येथील शेतकऱ्यांनी बैल पोळ्याचा सण सार्वजनिक साजरा न करता आपापल्या घरीच साजरा केला आहे.
हिंगोली - मागील 20 वर्षांपासून मराठवाडा-विदर्भ सीमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथे ट्रॅक्टरचा पोळा भरण्याची परंपरेला यंदा कोरोनामुळे खंड पडला आहे. दरवर्षी हा ट्रॅक्टरचा पोळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आवर्जून हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनामुळे अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
भोकरदन (जालना) - तालुक्यातील विविध गावांत बैलपोळा सण कोरोनाच्या सावटाखाली शेतकऱ्यांनी घरीच साजरा केला आहे. शेतकऱ्यांनी सजविलेल्या सर्जा-राजाच्या बैल जोडीला महिलांनी औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला.
नंदुरबार - राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही साध्या पद्धतीने करण्यात आला. सकाळी बैलांना अंघोळ घालून त्यांना सजविण्यात आले. त्यानंतर त्यांची पूजा करत त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलांची मिरवणूक काढण्यात आली नाही.
उस्मानाबाद - बैल पोळ्याच्या निमित्ताने बैल्यांच्या साजासाठीचे बाजारपेठांतील विविध दुकाने मागील पाच ते सहा दिवसांपासून सजली होती. मात्र, यंदा कोरोनामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाने महागडे साहित्य खरेदी करण्यास बगल देत. कमी पैशातच पोळा साजरा करण्यावर भर दिला आहे.
आंबेगाव (पुणे) - शेतकऱ्यांचा खरा सवंगडी मानल्या जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यांतील काही गावांमध्ये श्रावण बैलपोळा सण कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
येवला (नाशिक) - तालुक्यातील उंदीरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब सोनवणे व माधवराव क्षीरसागर या शेतकऱ्यांनी यंदा बैल पोळा वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यंदा त्यांनी बैलांवर विविध संदेश लिहिले होते. 'मी मास्क लावतो तुम्हीपण लावा', कोरोना टाळा, कोरोना रुग्णाकडे तुच्छतेने पाहू नका, माझ्या पोळा सणावर कोरोना सावट, असे संदेश लिहिले होते.
यवतमाळ - कोरोनामुळे पोळा सण शेतकर्यांना घरीच साजरा करावा लागला आहे. तान्हा पोळा हा बच्चे कंपनीसाठी आनंदाचा सण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे चांगले उत्पन्न झाले नाही यामुळे यंदा मातीच्या बैल खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे विक्रेते चिंतेत पडले आहे.
राजूरा (चंद्रपूर) - जंगल शिवारात पाळीव जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर ऐन बैल पोळ्याच्या दिवशी वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वासूदेव कोंडेकर, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते नवेगाव येथील रहिवासी होते.