मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी 'लॉकडाऊन'चा कालावधी 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. अशातच राज्यातील रेड झोन मधील दैनंदिन व्यवहार गेल्या 1 महिन्यांपासून ठप्प झाल्याने याचा फटका ब्राह्मण समाजातील पुजाकर्म करणाऱ्या नागरिकांना बसला आहे. सध्या मंदिर, पूजा, लग्नकार्य बंद असून केवळ एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर केल्या जाणाऱ्या दशक्रिया विधीवर ब्राह्मण समाजातील काही जणांची उपजीविका अवलंबून आहे.
'लॉकडाऊन' असल्यामुळे 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार विधीनंतर उत्तरकार्य करण्यास सध्या स्मशानभूमीतील ठेकेदारांकडून मनाई करण्यात येत आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
स्मशानात मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवूनसुद्धा उत्तरकार्य केले जाऊ शकते, मात्र त्याला देखील मनाई केली जात आहे. त्यामुळे रोजगार बुडत असल्याचे संजय व्यवहारे यांनी सांगितले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष देत मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पौराहित्य करणाऱ्यांकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे या नागरिकांची उपासमार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.