मुंबई - औरंगाबाद शहराचा नामांतराचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. या मुद्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसत नाही. या विषयवार मनसे नेते आक्रमक झाले आहेत. जो पर्यंत शिवसेना सत्तेची लाचारी सोडत नही, तो पर्यंत औरंगाबादचे नामकरण होणे शक्य नाही, अशी खरमरीत टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
हेही वाचा - नामांतरावरून तापले महाराष्ट्रातील राजकारण
नामांतर करण्यात शिवसेनेला काँग्रेसची गरज लागणार आहे आणि काँग्रेस तयार नाही. शिवसेनेची वेळ आलेली आहे, लाचारी करायची किंवा सन्मान राखून काम करायचे. शिवसेनेला नामांतर करायचे होते तर विमानतळाच्या अगोदर शहराचे नामकरण करायचे होते. आता ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ही लाचार सेना झाली आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.
बाळा नांदगावकर यांनी देखील केली होती टीका
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी औरंगाबादच्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीदरम्यान औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. तेव्हापासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे अशी सर्वांची भावना आहे. मात्र, या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या पक्षामध्ये आता निष्ठावंत म्हणून आलेले मंत्री अब्दुल सत्तार म्हणणात, मी संभाजीनगर म्हणणार नाही. मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद हेच बोलण्याची मुभा दिली आहे. हे जर खरे असेल तर मुख्यमंत्र्यांनी ते खरे की खोटे हे जनतेला सांगितले पाहिजे. श्रेय केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने घ्यावे, मात्र संभाजीनगर हेच नाव असावे, अशी जनतेची भूमिका आहे. या भावनेचा आदर राखणे आवश्यक आहे, असेही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितल होते. त्यानंतर आज संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेवर शाब्दिक हल्ला केला.
काय आहे नेमका वाद
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा औरंगाबादचे संभाजीनगर, या मुद्यावर राजकारण तापले आहे. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेनेचे मरण झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधानंतर आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे.
हेही वाचा - अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपाल एनसीबी चौकशीला गैरहजर