मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि सचिन वाझे यांच्या वसुली प्रकरणात अटक करण्यात आलेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुनील माने यांचे व त्यांच्या अनेक नातेवाईकांचे शिवसेना पक्षाशी घनिष्ठ संबंध आहेत. या नातेवाईकांनी अनेक बेकायदा कृत्ये केल्याचा संशय आहे. त्यामुळे माने यांच्या शिवसेना 'कनेक्शन'ची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) महासंचालकांना पत्र लिहून ही मागणी केली. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत माने यांचे शिवसेनेशी संबंध असल्याची कुजबूज होती. मात्र, आता भातखळकर यांनीच थेट आरोप केल्याने यासंदर्भातील चर्चेला उधाण आले आहे. माने यांचे नातलग असलेले शिवसेनेचे नगरसेवक दाम्पत्य कोण? अशीही चर्चा सुरू झाली आहे.
माने यांचे अनेक नातलग शिवसेनेत असून त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच खुद्द सुनील माने यांचा शिवसेनेच्या नेत्यांशी सुद्धा जवळचा संबंध असल्याने त्यांच्या शिवसेना 'कनेक्शन'ची सखोल चौकशी करावी. कदाचित त्यातून सचिन वाझे यांच्याप्रमाणेच माने यांचे शिवसेना कनेक्शन व त्यामुळे त्यांच्यावर कोणीतरी मेहेरनजर दाखवली होती का? हे देखील उघड होईल, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - केंद्राकडून मिळाला लशींचा मोजकाच साठा; मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद