मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 एप्रिलपासून लॉकडाउनच्या नियमावलीत बदल करताना, सरकारी कार्यालयातील उपस्थिती 5 टक्यांवरून 10 टक्के केली होती. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला तडा जात असल्याने पुन्हा सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 5 टक्क्यांवर आणली आहे.
सरकारी कार्यालयात शहराच्या कानाकोपऱ्यातून कर्मचारी अत्यावश्यक सेवेच्या बसमधून कार्यालयात येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या बसमध्ये देखील गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे परिसरात वाढत असून या स्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा सरकारी कार्यालयातील उपस्थिती 5 टक्के केली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले. दरम्यान, ज्या ठिकाणी ग्रीन झोन घोषित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.