मुंबई : छत्रपती शिवरायांच्या जन्मावर आधारित जाणता राजा हे महानाट्य म्हणजे मराठी रसिकांना पर्वणी आहे. सुगी ग्रुप यांच्या संकल्पनेतून रंगमंचावर अवतरलेल्या या महानाट्यास आमदार आशिश शेलार यांनी पाठबळ दिल्याने रसिकांना आनंद लुटता येत आहे. 14 मार्च पासून 19 मार्च पर्यंत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सुरू असलेल्या या सोहळ्याला दररोज हजारो प्रेक्षक गर्दी करत आहेत.
छत्रपती शिवाजी पार्कपासून माझी सुरुवात : तेंडुलकरशनिवारी या महानाट्याला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, माझी शाळेतील इतिहासाची सुरुवात ही छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून झाली. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्या सर्वांना माहित आहेच. तर, माझ्या खेळाची सुरुवात या शिवाजी पार्क मैदानापासून झाली. छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण जीवनावरील हे महानाट्य पाहण्याची संधी मला मिळाली आहे. ही अनुभूती अत्यंत स्फूर्तीदायक आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय यांना वंदन केल्याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याशिवाय राहत नाही, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
छत्रपती शिवराय म्हणजे दूरदृष्टी : छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासाठी आराध्य दैवत आहे. छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये अनेक गड किल्ले उभारले. छत्रपतीनी महाराष्ट्रात आरमार उभे केले. छत्रपती शिवरायांसारखा दूरदृष्टी असलेला राज महाराष्ट्राला लाभला., मराठी स्वराज्याला लाभला. त्यांच्या वास्तुकलेतील ज्ञानाचा, दूरदृष्टीचा अनुभव आपण आजवर घेत आहोत असे सुगी ग्रुपचे असोसिएट व्हॉईस प्रेसिडेंट, मार्केटिंग हेड समीर खेर यांनी म्हटले आहे. आम्ही छत्रपती शिवरायांच्या या दूरदृष्टीला, त्यांच्या जीवनपटाला पुन्हा एकदा मराठी रसिकांच्या समोर मांडण्यासाठी जाणता राजा या महानाट्याचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रातील जनतेसमोर पुन्हा एकदा हे महानाट्य अकरा वर्षांनी घेऊन येताना आम्हाला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया सुगी ग्रुपचे मार्केटिंग हेड समीर खेर यांनी व्यक्त केली.
प्रेक्षकांनी आनंद केला व्यक्त : यावेळी बोलताना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचे हे महानाट्य पाहण्याचा हा आलेला योग अत्यंत आनंददायी आहे. यासाठी मुंबई प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे आपण खूप खूप ऋणी आहोत. जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाला दररोज दहा हजार पेक्षा अधिक प्रेक्षक हजेरी लावून छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देत असल्याबद्दल रसिक प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला.