मुंबई : शहरातील ग्रॅण्ट रोड परिसरात असलेल्या पार्वती मेन्शन या चाळीत रक्तरंजित घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चेतन गाला या 54 वर्षीय इसमाने शेजारी राहणाऱ्या पाच लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू आणि तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात : या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या रूग्णांना एच.एन. रिलायन्स रुग्णालय तसेच नायर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी चेतन गाला या आरोपी इसमास ताब्यात घेतले असुन या प्रकरणी गुन्हा नोंद दाखल करण्यात येत आहे. जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री अशी दोन्ही मृत पती- पत्नीची नावे आहेत.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू : डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या भयानक घटनेने दहशत निर्माण झाली आहे. चेतन गाला याने शेजारी राहणाऱ्या पाच जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी गंभीर झालेल्या दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डी बी मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंबीय सदस्य घर सोडून गेल्यामुळे आरोपी चेतन गाला मानसिक तणावात होता. मानसिक तणावात असलेल्या चेतन गालाने रागाच्या भरात हा हल्ला केला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
काय म्हणाले पोलिस अधिकारी : पोलीस उपायुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून चेतन गाला हा त्याची बायको आणि मुलांपासून विभक्त राहत होता. शेजाऱ्यांमुळे त्याची पत्नी आणि मुले वेगळे झाल्याचे चेतन गाला या आरोपीने पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. सध्या मानसिक स्थिती नसल्यामुळे आरोपीची अधिक चौकशी केली जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
तिघांवर उपचार सुरू : आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ला केलेल्या लोकांमुळेच स्वतःचे कुटुंब सोडून गेले. या विचारानेच आणि रागाने त्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. उर्वरित तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डी बी मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आणि घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करून अटकेची प्रक्रिया सुरु आहे.