मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर गुरुवारी सायंकाळी काळ्या रंगाची बेवारस कार आढळली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) या कारची सखोल तपासणी केली असता जिलेटीनच्या 20 कांड्या आढळल्या. संशयित दोन गाड्या पकडण्यासाठी पोलीस आणि एटीएसने सर्वात प्रथम ट्रफिक सिग्नल आणि अंबानींच्या घराच्या आसपास असणारे सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. या गाड्या दुसऱ्या राज्यातून आल्या होत्या की राज्यातीलच आहेत, याबाबत शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांना एका गाडीमध्ये अनेक नंबर प्लेट मिळाल्या आहेत. या नंबर प्लेटवरील नंबर अंबानींच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांशी साधर्म्य असणाऱ्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. एटीएस पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
मुंबईतील पेडर रोड परिसरातील मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ एक बेवारस गाडी आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली. यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्याचे समोर आले आहे. या कारच्या क्रमांकावरुन त्याच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणी आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सखोल तयार सुरू केला असून लवकरच काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंबानींना आहे कडक सुरक्षा -
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना ‘सीआरपीएफ’ची ‘झेड’ सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच खासगी सुरक्षा रक्षकदेखील कायम त्यांच्याशेजारी तैनात असतात. त्यांच्या बंगल्याशेजारी हाय सेक्युरिटी झोन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात स्फोटके कसे काय आढळून आले हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
सर्वात श्रीमंत भारतीय आहेत अंबानी -
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे सलग १३ व्या वर्षी फोर्ब्सच्या सर्वात १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांवर आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत ३७.३ अब्ज डॉलरची वाढ होऊन एकूण ८८.७ अब्ज संपत्ती झाली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे.