मुंबई Atal Setu Inauguration : आज (12 जानेवारी) देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू आणि महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित न्हावाशेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मात्र, या उद्घाटनावरुन आता मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय. या कार्यक्रमासाठी ऐनवेळी निमंत्रण मिळल्यानं ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केली असून, या लोकार्पण सोहळ्यावर शिवसेना (ठाकरे गटाने) बहिष्कार टाकला आहे.
ऐनवेळी निमंत्रण दिल्याने नाराजी : मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे. तसंच कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, या लोकार्पण सोहळ्यासाठी कालपर्यंत ( 11 जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. ठाकरे गटाला आज सकाळी ऐनवेळी या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. मतदारसंघातील आणि स्थानिक आमदार, खासदार यांना एक दिवस अगोदर निमंत्रण येणं अपेक्षित होते. पण ऐनवेळी निमंत्रण मिळल्यानं ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केली असून, या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळं उद्घाटनापूर्वीच मानापमान नाट्य बघायला मिळत आहे.
निमंत्रण पत्रिकेवर नावाचा उल्लेख नाही : तसंच या निमंत्रण पत्रिकेवर ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांची नावच टाकण्यात आलेली नाहीत. प्रोटोकॉलनुसार ज्या मतदारसंघात कार्यक्रम होत आहे, तिथले स्थानिक आमदार, खासदार यांची निमंत्रण पत्रिकेवर नावे येणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र, निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या नावाचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. मात्र, सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांची नावं या निमंत्रण पत्रिकेवर टाकण्यात आली आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून थेट कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा -