मुंबई- शासनाकडून कोरोना विरुद्धच्या लढ्यात कार्यरत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील इंटर्न डॉक्टर्सना योग्य मानधन मिळावे, या मागणीसाठी असोसिएशन स्टेट मेडिकल इंटर्नस(आस्मि)च्या विश्वस्त मंडळाने मनसे नेते अमित ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आस्मिच्या मागण्यांचे पत्र अमित ठाकरेंना देण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयातील सीपीएस डॉक्टर्सना दरमहा 50 हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. तर द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षांतील एमबीबीएस विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये तर विद्यार्थी परिचारिकांना दरमहा 20 हजार रुपये देण्यात येते. याच ताकदीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्न डॉक्टर्स कोरोना विरुद्धच्या लढ्यात सेवा देत आहेत. तरी आम्हाला आमच्या 11000 रुपये विद्यावेतनाव्यतिरिक्त सरकारकडून इतर कोणतेही मानधन दिले जात नाही.याबाबतीत लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती असोसिएशन स्टेट मेडिकल इंटर्नस(आस्मि)च्या विश्वस्त मंडळाने अमित ठाकरेंकडे केली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या सीपीएस डॉक्टरांना आता 14800 वरून 50 हजार पगारवाढ करण्यात आली आहे. तर, बंधपत्रित डॉक्टरांना 20 ते 25 हजार अशी पगारवाढ मिळणार आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय झाला असून पुढच्या महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असेही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. आजच हा निर्णय घेण्यात आला.