मुंबई - राज्यात आम्हाला जे मोठे अपयश आले त्याची माहिती घेण्यासाठी सर्व उमेदवारांची बैठक आम्ही बोलावली आहे. आम्हाला आलेल्या अपयशाचे मुख्य कारण वंचित बहुजन आघाडीने घेतलेली मते आहे. त्याचा मोठा फटका आम्हाला बसला असल्याची कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. टिळक भवन, दादर येथे काँग्रेसची चिंतन बैठक सुरू आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह लोकसभेसाठी उभे राहिलेले काँग्रेसचे बहुतांश उमेवार उपस्थित आहेत.
चव्हाण यांनी सांगितले की, राज्यात काँग्रेसने ऊभे केलेले सर्व 27 उमेदवारांना या बैठकीला बोलावले आहे. आम्हाला आलेले नेमके अपयश आणि त्यासाठी असलेल्या सर्व कारणांचा शोध घेतला जात आहे. राज्यभरात बुथनिहाय मतदान आणि त्यासाठीची माहिती आम्ही घेत आहोत. त्यासाठीची सर्व कारणे समोर आल्यास पक्षाकडून योग्य तो निर्णय जाहीर केला जाणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच राहावेत अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची इच्छा आहे, त्यासाठी त्यांना विनंती केली जात आहे. पक्षातून कोणीही भाजप मध्ये जात नाही, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्या बातम्या निराधार आहेत. लोकसभा निकालानंतर देशातील बहुतांश वृत्तवाहिन्यांवर सगळे एकांगी मत मांडणे सुरू असल्याने पक्षाने महिनाभर प्रवक्त्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असा निर्णय घेतला आहे. परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा आम्ही बोलत राहू. मात्र, या दरम्यान कोणीही माध्यमाच्या पुढे जाऊन पक्षाची भूमिका मांडणार नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
सकाळी माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावर चव्हाण यांना विचाराले असता ते म्हणाले की, माणिकराव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यासह झालेली भेट ही त्यांची खासगी भेट होती. त्यांचा पक्षाच्या भूमिकेशी काहीही संबंध नाही. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मनसेला आघाडीत घ्यायचे की नाही, हा विषय आता आमच्या चर्चेला नाही. मात्र, परिस्थिती पाहून योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान या बैठकीत लोकसभेचे अपयश आणि विधानसभा निवडणुकीसाठी काय बांधणी करता येईल यावरही चर्चा केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.