मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर आज त्यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या मुद्द्यावर देशभर काँग्रेसने आवाज उठवला असून याचे पडसाद महाराष्ट्रातही विधानसभेत उमटले. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या या कारवाईबाबत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे.
राहुल गांधींना घाबरले : ज्या पद्धतीने सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना टार्गेट करत आले आहेत. यावरून त्यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई केली गेली असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेनंतर विशेष करून राहुल गांधी यांची लोकप्रियता ज्या पद्धतीने देशामध्ये वाढली आहे. त्याला ते पूर्णतः घाबरले असून कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचही त्यांनी म्हटले आहे. याबाबत महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले आहेत.
ऐतिहासिक परंपरेला गालबोट - यशोमती ठाकूर
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींच्या खासदार रद्द प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आमचे नेते राहुल गांधी सातत्याने सरकारचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढत आहेत. त्यातच हिंडेनबर्ग संस्थेने पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती गौतम अदानी यांच्या समुहाचा आर्थिक गैरव्यवहारच बाहेर काढला होता. आता त्याचा दुसरा एपिसोडही लवकरच ते प्रसिद्ध करणार आहेत. त्यामुळे सैरभर झालेल्या केंद्र सरकारने अदानी घोटाळ्याची चौकशी करणा-या राहुल गांधी यांच्या मागेच चौकशीचा ससेमिरा लावलेला आहे. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला विधिमंडळ परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोडे मारण्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या ऐतिहासिक परंपरेला गालबोट लागले आहे.
देश घटनेवर चालणारा : यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, कोट्यवधी भारतीयांनी विश्वासानं पैसा गुंतविलेला होता, त्याच अदानी समुहानं कशापद्धतीनं आर्थिक गैरकारभार केला त्याचा लेखाजोखाच हिंडेनबर्ग समुहानं जगासमोर मांडल्यापासून मोदी सरकारचा अदानी यांना वाचविण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहेत. अदानी प्रकरणावर बोलणा-यांची तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात खोट्या केसेस, चौकशांचा ससेमिरा लावला जात आहे. पण हा देश गांधींच्या विचारांवर आणि आंबेडकरांच्या घटनेवर चालणार आहे, असेही ॲड. यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.