मुंबई - वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मंत्री आशिष शेलार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत विजय आपलाच निश्चित असल्याचा दावा केला. शेलार हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाईं महायुतीचे उमेदवार आहेत.
सकाळी आशिष शेलार यांनी वांद्रे येथील प्रसिद्ध जरीमरी मंदिर येथे तसेच महिम दर्गा, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खार येथील पुतळ्याला अभिवादन करुन आणि गुरुद्वारा व माऊंट मेरीचे सपत्निक दर्शन घेतले. त्यानंतर लिंकीग रोडवरील निवडणूक कार्यालयासमोरुन विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली.
हेही वाचा - शीना बोरा हत्या प्रकरण: इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्यात घटस्फोट
महायुतील सर्व पक्षांचे झेंडे, ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत. खार दांड्यातील कोळी महिलांच्या पारंपारिक नृत्यासह रॅली जसजशी पुढे सरकत होती, तसतसा जागो-जागी चौका-चौकात त्यांचे स्वागत करण्यात येत होते. शेलार यांनी आर.व्ही टेक्निकल हायस्कूल येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. तिथीनुसार आज शेलार यांचा वाढदिवस असल्याने जागोजागी त्यांचे महिलांनी औक्षण केले.
यावेळी खासदार पुनम महाजन, नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाळा, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, शिवसेनेचे विभाग प्रमुख बाळा चव्हाण, उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे, सुरेश दुबे, चिंतामणी तिवटे, रिपाइचे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार, माजी नगरसेवक दीपक पडवळ, क्रांती साठे, प्रिया पडवळ यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते.
हेही वाचा - मनसेची तिसरी यादी जाहीर, 32 जणांच्या नावाचा समावेश