मुंबई - जगभर 5 जून पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणात प्रत्येक प्राण्याचे एक वेगळे अस्तित्व आहे. या अस्तित्वावर घाला घालण्याचे काम अनेक वेळा मनुष्याकडून झाले आहे. पर्यावरणाप्रती मनुष्य सजग कधी होणार, हा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. याच भावनेला पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाचा फोडण्यासाठी कलाकार निलेश चौहान यांनी पिंपळाच्या पानावर हत्तीणीचे चित्र कोरून अनोख्या कलाकृतीद्वारे भावनेला वाट करून दिली.
मुक्या प्राण्यांना मारण्यासाठी मनुष्य क्रूरतेने वागतो. हे केरळमधील घटनेने पुन्हा एकदा समोर आले. भुकेने व्याकुळ झालेल्या एक गर्भवती हत्तीणीने फटाक्यांची दारू भरलेला अननस खाल्ला. तो फुटल्याने त्यात मनुष्याने पेरलेल्या फटाक्याचे विषारी रसायन तिच्या शरीरात पसरले आणि असंख्य वेदनांनी तिच्यासह तिच्या गर्भातील जीवाचा मृत्यू झाला. मानव जातीला काळिमा फासणारी ही घटना आहे. अशाप्रकारे क्रूरतेने प्राण्यांना मारणे अमानवी आहे. अशा अनेक घटना होतच आहेत. तरी आपण पर्यावरण दिन साजरा करतोच कसा, अशा प्रश्न निलेश यांनी विचारला आहे. याच विवंचनेतून निलेशने एक अननस आणि ते खाण्यासाठी जात असलेली एक भुकेली गर्भवती हत्तीण पिंपळाच्या पानावर कोरली आहे.
‘केरळच्या घटनेने मी अस्वस्थ होतो. पर्यावरण दिन कसा साजरा करावा आणि का करावा, हा प्रश्न मी स्वतःला विचारत होतो. हा दिवस साजरा करताना त्याला दुःखाची किनार आहे. कारण, माणूस मुक्या प्राण्यांशी कसा वागतो, हे वारंवार समोर आले आहे. त्यातूनच मला ही कलाकृती सुचली. हीच त्या मातेला आदरांजली ठरेल,' असे निलेश यांनी सांगितले. 'Rip Mother Nature. As a human I am sorry’ असा संदेशही निलेश यांनी त्यांच्या कलाकृतीतून दिला आहे.