मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईमध्ये सध्या लोकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कलाकारदेखील घरीच बसून आहेत. मात्र, कलाकार या मिळालेल्या वेळेत काही तरी नवीन कला साकारतात असतात. अशाच प्रकारे पवई येथील रहिवासी आणि जेजे स्कुल ऑफ आर्ट्सचा माजी विद्यार्थी असलेल्या चेतन राऊतने रतन टाटा यांचे एक अनोखे पोट्रेट साकारले आहे.
देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून नेहमीच मोलाचे योगदान दिले जाते. सर्वात मोठं संकट म्हणून सध्या कोरोना आणि देशातील लॉकडाउनकडे पाहिलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना मदतीचे आवाहन केले आहे. यावर उद्योजक रतन टाटा यांनीही ह्या लढाईत मोलाची मदत केली आहे. या मदतीचे कौतुक म्हणून चेतन राऊतने रतन टाटा यांचे अनोखे पोट्रेट साकारले आहे. पेपर किंवा कापड भीतीवर व बोर्डवर बसवण्यात येणाऱ्या पुश पिनचे हे पोट्रेट आहे. सहा विविध रंगाच्या 3888 पुश पिन यात वापरल्या गेल्या आहेत.
चार तासाच्या अथक प्रयत्नाने चेतनने हे पोट्रेट साकारले आहे. या अगोदर त्याने तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील पोट्रेट साकारले होते. कलाकार म्हणून आपणही घरीच राहून ह्या लढाईत सहभागी होत असताना आपल्या कलेतून सुखद वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. आपल्या कलेतून अशा भारताच्या रत्नाला हे साकारलेले पोर्ट्रेट मी समर्पित करत आहे. असे मत, या पोट्रेटबाबत चेतन राऊत याने व्यक्त केले.