मुंबई - 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड विश्वास आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक तरी किती करावे, असा सवाल करत फडणवीस समाधानी आहेत, आणखी काय हवे, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखात फडणवीसांच्या वक्तव्याची वाह वा करण्यात आली आहे.
'गिरीश महाजनांना उद्देशून बोलताना, मला काही झाले तर सरकारी रुग्णालयात दाखल कर, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर उपहासात्मक भाष्य केले आहे. विरोधी पक्षनेते समाधानी आहेत. तशा त्यांच्या भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्तही केल्या. राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवे? अशा शब्दात सामनातून फडणवीसांचे 'कौतुक' केले आहे.
'फडणवीस यांना कोरोना वगैरे होऊ नये. त्यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभोच, त्यांचे बाल-बच्चे व राजकीय बगलबच्चेही सुखात राहोत ही आमच्यासारख्यांची ईश्वरचरणी प्रार्थना आहे' , असे सूचक विधानही आजच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.
कोविडप्रकरणी सरकारी यंत्रणा कशी काम करते आहे, कोठे काम करायला हवे व काय त्रुटी आहेत यासाठी विरोधी पक्षनेते राज्यभरात पाहणी दौरे करीत आहेत. विरोधी पक्षनेते पोहोचल्यामुळे प्रशासन गतिमान होते हा आमचा अनुभव आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे. फडणवीस हे काल राज्यकर्ते होते. त्यामुळे सरकारी यंत्रणा काय होती, काय आहे याचे भान त्यांना आहे. विरोधी पक्ष म्हणून ते टीका करतात हा त्यांचा अधिकार असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.