मुंबई : कोरोनाची चौथी लाट राज्यभरात पसरू लागली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये मुंबईत सरासरी 1000 करोना रुग्णांची नव्याने नोंद होते आहे. तर तितकेच रुग्ण बरेही होत आहेत. रुग्णवाढिचा वेग गेल्या आठ दिवसांपासून वाढला असून अत्यंत चिंताजनक बाब म्हणजे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज चार ते पाच रुग्णांचा मृत्यू होताना दिसतो आहे.
आतापर्यंत 85 मृत्यू : कोरोनाची चौथी लाट सुरू झाल्यापासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासकीय स्तरावर सुरू केल्या गेल्या आहेत. मात्र अद्यापही कोविड सेंटर सुरू करण्यात आलेली नाहीत. तसेच मास्क सक्तीही करण्यात आलेली नाही. परिणामी रुग्ण संख्या दररोज वाढत असून दररोज हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत ८५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
उष्माघाताचेही बळी : राज्यात गेल्या आठ दिवसांमध्ये तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे अनेक लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत तर गेल्याच आठवड्यात उष्माघातामुळे खारघर येथे १४ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी आहे. कोरोना आणि उष्माघाताचे राज्यात सुमारे 100 बळी गेले आहेत मात्र राज्य सरकार याबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसते.
आरोग्यमंत्र्यांना वेळ नाही : आरोग्य मंत्रालयातर्फे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उद्भवलेल्या कोरोना आणि उष्माघाताच्या गंभीर परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी एकही बैठक झाली नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांना आम्ही संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार देत आपल्याला वेळ नाही असे सांगून या गंभीर प्रकाराबाबत आपण किती उदासीन आहोत हेच दाखवून दिले.
राज्य सरकार राजकारणात मश्गूल : या संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले की, राज्यामध्ये कोरोना आणि उष्माघाताची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्य सरकार मात्र राजकारणामध्ये मश्गुल आहे. आपण जनतेसाठी किती काम करतो आणि कशी विकास कामे करतो हे सांगण्यासाठी सरकार वृत्तपत्रांमध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये मोठमोठ्या जाहिराती देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तानाजी सावंत यांच्या सारखा आरोग्यमंत्री आपण सरकार उलथून टाकण्यासाठी दीडशे बैठका घेतो असे एकीकडे सांगत असताना जनतेच्या हितासाठी आणि कोरोना उष्माघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी मात्र त्यांना एकही बैठक घ्यावी असे वाटत नाही हे राज्याचे दुर्दैव आहे, तानाजी सावंत जर असेच वागत राहिले तर राज्याचा चीन झाल्याशिवाय रहाणार नाही, अशी भीतीही कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.