मुंबई - रायगड पोलिसांनी बुधवारी केलेल्या अटकेला आव्हान देत रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती एस.एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम.एस कर्णिक यांचे खंडपीठ सुनावणी करू शकते.
कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या एका जुन्या प्रकरणात रायगड पोलिसांनी गोस्वामी यांना बुधवारी सकाळी अटक केली. सायंकाळी उशिरा गोस्वामी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील न्यायालयात हजर झाले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. सुमारे सहा तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर रिमांड ऑर्डर देण्यात आली. मात्र, गोस्वामींच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका
न्यायालयाने गोस्वामींना न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर त्यांचे वकील आबाद पोंडा आणि गौरव पारकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आणि अर्णबच्या अटकेला आव्हान दिले. वकील पोंडा यांच्या म्हणण्यानुसार न्यायालयाने पोलिसांना आपला जबाब नोंदविण्यास सांगितले आहे आणि गुरुवारी हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे. कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे अर्णब गोस्वामींना रात्री पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले, असे वकील पोंडा म्हणाले.
आमच्याकडे त्यांच्याविरूद्ध पुरावे
वास्तविक बुधवारी सकाळी अलिबाग पोलिसांच्या पथकाने अर्णब गोस्वामींना लोअर परळ येथील त्यांच्या घरातून अटक केली. अलिबाग पोलिसांनी कलम 306 आणि 34 अन्वये गोस्वामींना अटक केली. 2018 मध्ये अन्वय आणि त्याच्या आईच्या आत्महत्येच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली होती. आमच्याकडे त्यांच्याविरूद्ध पुरावे आहेत. आम्ही गोस्वामींच्या पत्नीला अटक केल्याची माहिती दिली, तेव्हा त्यांनी कागदपत्रे फाडली. मुंबईपासून 90 कि.मी. अंतरावर अलिबाग येथे पोहोचताच गोस्वामींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.