मुंबई - संपूर्ण देशभरात कोरोनाविरुद्ध लढाईच्या अग्रभागावर असलेल्या आरोग्य सेवा कर्मचारी, पोलिस आणि सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय वायु सेना आणि नौदल यांनी रविवारी एकादिलाने मानवंदना दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लढा देणाऱ्या आरोग्य विभाग, पोलीस, सफाई कामगार आदी कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ मुंबईत नौदलातील नौसैनिकांनी युद्धनौकांद्वारे अनोखी मानवंदना दिली. यासोबतच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर वायुदलाने आपल्या सुखोई 30 या लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास मार्चिंग करून ही मानवंदना दिली.
यासोबतच देशभरामध्ये श्रीनगर ते हैदराबाद, मुंबई ते इटानगरपर्यंत, हवाईदल आणि नौदलाने केलेल्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना वॉरियर्सना त्यांच्या लढाईबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि ह्या लढ्यात आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा संदेश देण्यात आला होता. देशभरातील डॉक्टरर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अनोख्या मानवंदनेचा स्वीकार करत भारतीय सैन्याचे आभार मानले.