मुंबई : संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. अमीन अलीकडेच सेटवर एका गाण्याचे शूटिंग करत असताना एका मोठ्या अपघातातून बचावला. ए.आर. अमीन याने इंस्टाग्रामवर या भयानक घटनेबद्दल खुलासा केला आहे. त्याने उघड केले की, गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरील क्रेनने लटकलेले झुंबर जमिनीवर कोसळले. यात त्याचा जवळजवळ चुराडाच झाला होता.
तीन दिवसांपूर्वी झाला अपघात : ए. आर. आमीनने लिहिले की, 'मी देव, माझे पालक, कुटुंब, हितचिंतक आणि माझे आध्यात्मिक गुरू यांचा आभारी आहे की मी आज सुरक्षित आणि जिवंत आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका गाण्यासाठी शूटिंग करत होतो. जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर असतो तेव्हा माझा माझ्या सुरक्षा टीमवर पूर्ण विश्वास असतो. मी शुटींगसाठी उभा होतो तेव्हा क्रेनमधून लटकलेले झुंबर अचानक खाली कोसळले. जर ते जराही इकडे - तिकडे किंवा काही सेकंद आधी किंवा नंतर कोसळले असते तर संपूर्ण रिग आमच्या डोक्यावर पडली असती. हे पाहून मला आणि माझ्या टीमला मोठा धक्का बसला आहे. मी या आघातातून सावरणे अशक्य आहे.
ए.आर. रहमानने जारी केले निवेदन : ए.आर. रहमानने आपल्या मुलाच्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवेदन जारी केले आणि सेटवर अधिक सुरक्षिततेची मागणी केली. ते म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा ए.आर. अमीन आणि त्याची स्टाइलिंग टीम मुंबईतील फिल्मसिटी येथ संभाव्य घातक अपघातातून चमत्कारिकरित्या बचावली. देवाच्या कृपेने या अपघातात कोणालाच दुखापत झाली नाही.
विमा कंपनीच्या निकालाची प्रतिक्षा : ते पुढे म्हणाले की, भारतातील फिल्म उद्योग झपाट्याने वाढतो आहे. मात्र त्या दृष्टीने आपल्या फिल्म इंडस्ट्रीटील सेट्स आणि लोकेशन्सची सुरक्षा जागतिक दर्जाच्या मानाने फारच अपुरी आहे. या सुरक्षितता मानकांच्या दिशेने आपल्याला हालचाली करणे आवश्यक आहे. आम्ही सर्वजण या घटनेने हादरलो आहोत. आम्ही विमा कंपनी तसेच गुडफेलास स्टुडिओज प्रोडक्शन कंपनीच्या चौकशीच्या निकालाची वाट पाहत आहोत.