मुंबई- अँटिजेन चाचणीचा अहवाल चुकीचा येत असल्याने कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. नागपूर येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान चहल यांनी हे आवाहन केले आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. धारावी, वरळी सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. ते स्वीकारत पालिकेने धारावी मॉडेल देशासमोर उभे केले. या मॉडेलची चर्चा दिल्लीपासून न्यूयॉर्कपर्यंत झाली. यामुळे हे मॉडेल नागपूर येथे राबवण्याचा विचार केला जात आहे. त्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते.
बैठकीत चहल यांनी लक्षणे दिसताच आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. मुंबईत 'चेस द व्हायरस' अभियानांतर्गत अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेला रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह येत आहे. यामुळे अँटिजेन टेस्टच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोरोनाचा अहवाल त्वरित मिळावा, यासाठी पालिका अँटिजन चाचणीवर भर देत आहे. पालिका कर्मचारी व मुंबई पोलीस यांची विविध प्रयोगशाळेत अँटिजन चाचणी होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण लवकर समोर येत असल्याचेही चहल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- रियाने जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतलेली नाही - अॅड. सतीश मानेशिंदे