मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसहीत मित्रपक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीची घोषणा करण्यात आली. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलात हा कार्यक्रम पार पडला. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी याचा ठराव मांडला. सर्वपक्षीय नेत्यांनी याला अनुमोदन दिले.
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत यावेळी आघाडीच्या नेत्यांनी केले. ही आघाडी केवळ पाच वर्षे नाही तर पुढचे तीस वर्ष टिकेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. धर्म, जाती याच्या आधारे कुणाशीही भेदभाव होणार नाही. सर्वांच्या विकासासाठी ही आघाडी काम करेल असे मत नेत्यांनी मांडले.
हे सरकार शेतकरी, मजूर, व्यापारी, उद्योगपती यांच्यासाठी काम करेल. शिक्षण, रोजगार, महिलांचे प्रश्न, संवेदनशील विषयावर चर्चा करुन तोडगा काढला जाईल असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्या देण्यात येईल असेही सांगण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला आहे असे ते मिश्किलपणे म्हणाले. ते म्हणाले, की आम्ही दीड दिवसांचा गणती ऐकला होता, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज घेतला.