मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली होती. आठवडाभरपूर्वी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परब यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना सोमवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभराने आज परब यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण परब यांना पुढील काही दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.
कोविड- १९ चे निदान झाल्यामुळे मी गेल्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाने मला कमीतकमी वेळेत डिस्चार्ज मिळाला असून मी आज सुखरूप घरी परतलो. क्वारंटाइन कालावधीनंतर मी पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईन. आपण माझ्या प्रति दाखवलेल्या प्रेम व शुभेच्छांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, असे परब यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अनिल परब यांच्यासह राज्यातील आठ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. परब यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईमधील शिवसेना आमदारांची बैठकही रद्द करण्यात आली होती.