मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला (Anil Deshmukh son Hrishikesh Deshmukh) मुंबई सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. (Hrishikesh Deshmukh granted bail). ऋषिकेश देशमुखला 100 कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामिन मंजूर आला आहे. त्यांनी सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ऋषिकेश यांना 3 लाखाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामिन मंजूर झाला आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज दाखल : ऋषिकेश देशमुख यांना ईडीच्या वतीने तीन समन्स पाठवण्यात आले होते. मात्र चौकशीला कार्यालयात न जाता त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी तसेच वकील इंद्रपाल सिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात बाजू मांडली होती. देशमुख यांच्या वतीने युक्तिवाद पूर्ण होऊन ईडीच्या वतीने तीन वेळा वेगवेगळ्या तारखा घेऊन देखील अद्याप युक्तिवाद करण्यात आला नसल्याने अर्ज मागे घेण्यात आला होता.
मनी लाँड्रिंग प्रकरणी देखील आरोपी : माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात अनेकवेळा जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. परंतु न्यायालयाकडून वारंवार त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हे देखील आरोपीच्या यादीत आहेत. ऋषिकेश यांनी त्यापूर्वीच अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र आता ऋषिकेश यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वी या प्रकरणात त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र आत्तापर्यंत ते कोणत्याही चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.
100 कोटी मागितल्याचा परमबीर सिंग यांचा आरोप : फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी आढळून आली होती. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमधून या प्रकरणांचे धागेदोरे मुंबई पोलिसांतले अधिकारी सचिन वाझे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि थेट तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोचले. अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना अटक करण्यात आली.
7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल : 100 कोटी कधी प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तब्बल बारा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहा आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
काय आहे प्रकरण? : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.