मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल समितीचे कामकाज आजपासून सुरू झाले आहे. ही समिती सिंह आणि देशमुख यांच्यातील आरोप - प्रत्यारोपाचा उलगडा करणार आहे.
समितीच्या कामकाजाला सुरूवात -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रूपये इतकी रक्कम वसूल करून देण्यास सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी न्यायाधीश कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने न्या. चांदीवाल समितीच्या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिली आहे. होमगार्ड व नागरी संरक्षण अखत्यारितील क्रॉस मैदान येथील जागा दिल्याचा शासन निर्णय जारी केला आहे. परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून हे आरोप केले होते. या समितीचे कामकाज आजपासून (गुरुवार) सुरु झाले आहे.
या मुद्यांवर होणार चौकशी -
सिंह यांनी केलेल्या आरोपानुसार गृहमंत्री देशमुख यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतीही गैरवर्तणूक, गुन्हा झाल्याचे निष्पन्न होईल, असा काही पुरावा दिला आहे का? मंत्री किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तसा काही गुन्हा केल्याचे निष्पन्न होते किंवा कसे ज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य तपास यंत्रणे मार्फत तपासाची गरज आहे का? संबंधित प्रकरणाशी अन्य कोणी निघडीत आहेत का? यासंदर्भातील चौकशी न्या. चांदीवाल समिती करून येत्या सहा महिन्यात शासनाला चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे.
हेही वाचा - 'ईडी'ने संपत्ती जप्त केल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..