मुंबई - पंचतारांकीत ताज हॉटेलवर बॉम्ब टाकला जाणार असल्याची धमकी आल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून कुलाबा आणि वांद्रे येथील ताज हॉटेलची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बारा वर्षांपूर्वी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2008 ला दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा धमकीचे फोन आल्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे.
सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता हॉटेल ताज पॅलेसच्या कर्मचाऱ्यांना फोन आला. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. यावेळी संबंधित व्यक्तीने 2008 प्रमाणेच हल्ला करणार असल्याची धमकी दिली. यानंतर दुसरा फोन वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे आला. तेथेही कॉल रिसिव्ह करणार्या कर्मचार्यांना याच पद्धतीने धमकावण्यात आले. दोन्ही ठिकाणी एकाच क्रमांकावरून पाकिस्तानातून फोन आले.