मुंबई : शहरातील अंगडियांना 6 कोटींचा चुना लावून धमकावणाऱ्या आरोपीला खंडणीविरोधी पथकानं मध्यप्रदेशातून अटक केली. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, त्याला न्यायालयानं 3 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. गौरव जैन असं त्या अंगडीयांना चुना लावणाऱ्या आरोपीचं नाव आहे. गौरव जैननं लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेल्या अंगडियाचे 1 कोटी 75 लाख हडप केले होते. आता मात्र अनेक तक्रारदार पुढं येत असल्याचं दिसून येत आहे. आता गौरव जैन याच्याविरोधात आणखी एका अंगडियानं 4 कोटीची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गौरव जैन रियल इस्टेट एजंट : खंडणी विरोधी पथकाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव जैन हा रियल इस्टेट एजंट आहे. गौरव जैननं गेल्या वर्षभरात मुंबईतील अंगडियांना टार्गेट करून पैसे उकळण्याचं तंत्र आत्मसात केलं. गौरव मुंबईतील एका अंगडियाच्या संपर्कात आला. त्यानंतर गौरवनं अंगडियाकडं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त कमिशन देण्याच्या नावाखाली मी पाठवून देत असलेले पैसे देखील वळते कर, असं कर्मचाऱ्यांना सांगितलं. सुरुवातीच्या काळात गौरव जैननं आघाडीच्या कर्मचाऱ्यांद्वारे जास्त कमिशनचे आमिष दाखवून पैसे पाठवले. नंतर ज्या ठिकाणी कर्मचारी काम करत आहेत, त्या अंगडियाचेच पैसे वळवण्यास सांगत असे. नंतर हिशोबाच्यावेळी कर्मचाऱ्यांनी काहीतरी हिशोबात गफलत केल्याचं कारण पुढं करून वेळ मारून नेत असत.
फसवणुकीची तक्रार केल्यानं भोपाळमध्ये मारहाण : तक्रारदार अंगडिया यांना एक कोटी 75 लाखांची तफावत आढळून आल्यानंतर त्यांनी गौरव जैनची मध्य प्रदेशातील भोपाळ इथं चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांना लक्षात आलं. पैसे मागण्यासाठी फोन केल्यानंतर गौरव जैन कर्मचाऱ्यांना भोपाळ इथं बोलवत होता. भोपाळला गेल्यानंतर जैन धमक्या देऊन मारहाण करुन लोकांना पाठवत असे. त्याचप्रमाणं एकदा मुंबईत अंगडियाच्या कार्यालयात येऊन गौरव जैननं त्याला मारहाण देखील केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याचवेळी अंगाडियानं तक्रार न देता काही दिवसांनी एलटी मार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाकडं ही तक्रार आल्यानं गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं मध्यप्रदेशात जाऊन भोपाळहून आरोपी गौरव जैनला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गौरव जैन खून प्रकरणातील दोषी : गौरव जैन हा इस्टेट एजंट असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मध्यप्रदेशातील एका खून प्रकरणात गौरव जैन हा खुनाच्या गुन्ह्यातील दोषी आहे. 2009 मध्ये गौरव जैनला सत्र न्यायालयानं दोषी ठरवून त्याला शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयानं आरोपी गौरव जैनची जामिनावर सुटका केली आहे. आरोपी गौरव जैनला वडील नसून तो आई आणि भावासोबत भोपाळमध्ये राहतो. माजी नगरसेवक, आमदाराशी ओळख आहे, अशा बढाया मारून आणि अंगडिया असल्याचं सांगून इतर अंगडियांना तो चुना लावण्याचं काम करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
गौरव जैननं हडपले अंगडियाचे चार कोटी रुपये : गौरव जैनवर आता दुसरी तक्रार देखील खंडणी विरोधी पथकाकडं दाखल झाली आहे. या अंगडियाचे चार कोटी रुपये गौरव जैननं अशाच प्रकारे हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अजून इतरही अंगडिया तक्रार करण्यासाठी पुढं येण्याची शक्यता खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना वर्तवली आहे.
कमिशन जास्त देण्याचं आमिष : खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन शर्मा (40) हे मुंबईतील भुलेश्वर येथील एका अंगडिया व्यापाऱ्याकडं मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गौरव जैन नावाच्या व्यक्तीनं त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्यासोबत व्यवसाय करण्यास सांगितलं. जैननं शर्मा यांना सांगितले की, तुमचा मालक 80 पैसे कमिशन देत असेल, तर मी 20 पैसे जास्त म्हणजेच एक रुपया कमिशन देईन. नंतर शर्मा हे जैन यांनी दिलेल्या आमिषाला बळी पडून जैनसोबत काम करू लागले. गौरव जैननं एप्रिल महिन्यात शर्मा यांना एक कोटी रुपये पाठवून ते दिल्ली आणि अहमदाबादला पाठवण्यास सांगितले. ते काम शर्मा यांनी केलं. हे पैसे दिल्ली आणि अहमदाबादला पाठवल्याबद्दल शर्मा यांना 20 टक्के जास्त कमिशन मिळालं. यानंतर जैन शर्मा यांना पैसे पाठवत असे, जे शर्मा जैननं सांगितलेल्या ठिकाणी पाठवायचे.
बँक खाते तपासल्यानंतर फुटलं बिंग : गौरव जैन हा शर्मा यांच्या कार्यालयात सतत पैसे पाठवत असे, त्यामुळे शर्मा यांचा त्याच्यावरील विश्वास वाढला. शर्मा गौरव जैन याच्या सांगितलेल्या ठिकाणी पैसे पाठवत होते. हा सर्व पैसा शर्मा ज्या अंगडिया व्यापार्याकडं काम करत असे, त्यांचा पैसा वापरू लागला. जून महिन्यात शर्माच्या बॉसनं भुलेश्वरच्या ऑफिसमध्ये हिशेब तपासण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर शर्मा यांनी जैनला फोन करून पाठवलेले पैसे परत देण्यास सांगितलं. शर्मा यांचा बॉस त्यांचे बँक खाते तपासण्यासाठी आले असता, शर्माने गौरव जैनला त्यांचे थकीत पैसे लवकर पाठवण्यास सांगितलं. त्यानंतर गौरव जैननं शर्मा यांना किती पैसे देणं बाकी असल्याचं विचारलं. शर्मा यांनी त्याला पीडीएफ पाठवला, त्यानुसार जैननं ९० लाख रुपये दिले होते. मात्र शर्मा यांच्याकडं अडीच कोटी रुपये थकीत असल्याचं जैननं सांगितलं. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, गौरव जैननं त्याच्यामार्फत इतर शहरांमध्ये पैसे पाठवले होते. मात्र गौरव जैननं शर्मा यांना जास्त पैसे दिल्याचा दावा केला होता.
हेही वाचा -