मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रोज ८ ते ११ हजार रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. त्यातच गेल्या तीन दिवसात मुंबईमधील अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली व ग्रँटरोड या विभागातील रुग्णसंख्येचा आलेख वाढताच राहिला आहे. १५ ते १७ एप्रिलपर्यंत तीन दिवसात या विभागात प्रत्येकी दीड हजारावर नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहेत.
१५ दिवसांपूर्वी वांद्रे, गोरेगाव, घाटकोपर, चेंबूर येथील रुग्णसंख्या वाढली होती. मात्र चार - पाच दिवसांपासून येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आता अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली व ग्रँटरोड या विभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. १५ ते १७ एप्रिल या तीन दिवसांतील आकडेवारी लक्षात घेतली तर येथे रोज प्रत्येकी विभागात साडेचारशे ते सहाशेवर रुग्ण आढळत आहेत. मागील तीन दिवसांत या प्रत्येक विभागात दीड हजारावर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे या विभागात पालिकेने अधिक लक्ष वेधले असून उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले.
इमारतीतील रुग्णांची संख्या अधिक -
झोपडपट्टी, चाळींपेक्षा इमारतीत सर्वाधिक ८० टक्के रुग्ण सापडत आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित केल्या जात आहेत. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणाऱ्यांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे, बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी, जीवनावश्यक वस्तू सोसायटीच्या गेटवर स्वीकारणे, पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती प्रशासनाला द्यावी, अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. कोरोनाचे नियम मोडणाऱ्या सोसायट्या व संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कडक अंमलबजावणी -
सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या विभागांवर पालिकेने अधिक लक्ष वेधून तेथे नियमाची कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तातडीने शोध घेऊन संबंधितांना क्वारंटाईन केले जाते आहे. खाटांची संख्या, ऑक्सिजन, वेंटिलेटर आदीची पुरेशी उपलब्धता करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तीन दिवसांतील एकूण रुग्णांची नोंद -
* अंधेरी - २०२९
* मालाड - १६३०
* कांदिवली - १६२५
* बोरीवली - १६२४
* ग्रँटरोड - १४२७