मुंबई - आज या दशकातील शेवटचे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. भारताच्या काही भागात कंकणाकृती ग्रहण दिसले तर, काही ठिकाणी खंडग्रास दिसले. मुंबईत काही ढगाळ वातावरण आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याची अनेकांना संधी मिळाली नाही. मात्र, प्रभादेवी येथे बच्चेकंपनीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदकिशोर तळाशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. तळाशीकर यांनी मुलांना ग्रहणामागचे वैज्ञानिक कारण समजावून सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रभादेवी येथील प्रभा-विनायक सोसायटीच्या गच्चीवर मुलांसाठी ग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. विशेष चष्मे वापरून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बच्चे कंपनीने ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. ग्रहण पाहिल्याने अनिष्ठ घडते, गरोदर महिलांवर दुष्परिणाम होतात, ग्रहणात भरून ठेवलेले पाणी पिणे चांगले नाही, असे अनेक समज गैरसमज समाजात आहेत. मुलांना वैज्ञानिक दृष्टीकोनातून ग्रहणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न अंनिसचे नंदकिशोर तळाशीकर यांनी केला.
ग्रहण हे एक खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता घरातून बाहेर पडले पाहिजे. सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक आहेत. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये आज चंद्र आल्याने सूर्याची किरणे अडवली गेली. या साध्या कारणामुळे सूर्यालाग्रहण लागले. ग्रहणाचे वेगवेगळे प्रकारदेखील तळाशीकर यांनी मुलांना समजावून सांगितले.