मुंबई - लुडोत हरल्याच्या रागातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी मुंबई-मालाड पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला व आरोपीला ताबडतोब अटक केली. अमित राज पोपट उर्फ जिमी (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे, तर तुकाराम नलवडे (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - नायर रूग्णालयात मार्डचे डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मार्च 2021 रोजी तुकाराम नलवडे आणि त्यांचे मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी हा मालाड येथील दारूवाला कंपाऊंडमध्ये मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. यात तुकाराम हे वारंवार जिंकत होते. याचा राग आल्याने तुकाराम यांचा मित्र जिमी याने त्यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेला आणि जिमी याने तुकाराम यांना मारहाण केली. यात तुकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम यांच्या मुलीने मालाड पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई-मालाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला ताबडतोब अटक केली.
हेही वाचा - अनिल देशमुख शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल, अजित पवारही हजर