मुंबई- ठाणेहून मुंबई जेजे रूग्णालय मार्गे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका चेंबूर येथील अमर महल पुलावरून थेट दुकानावर कोसळली. ही घटना गुरूवारी रात्री उशीरा घडली. ज्या दुकानावर ही रूग्णवाहिका कोसळली ते दुकान मजबूत असल्याने सुदैवाने जीवीतहानी टळली.
चेंबुरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका कोसळली दुकानावर मिळालेल्या माहीतीनुसार, चेंबूर येथे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अमर महल पुलावरून एक रुग्णवाहिका कोसळल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. मनपाडा पोलीस स्थानक अंतर्गत एक खून झाला होता. त्या प्रकरणातील मृतदेह घेऊन ही रूग्णवाहिका जे.जे. रुग्णालयात जात होती. भरधाव वेगातील रुग्णवाहिकेवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही रुग्णवाहिका थेट पुलाच्या खाली असलेल्या दुकानावर कोसळली. हे दुकान मजबूत असल्याने अनुचित प्रकार घडला नाही. तसेच रुग्णवाहिकेचा चालकदेखील बचावला आहे. दरम्यान, हा पूल कमकुवत झाला असून येथे अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पालिकेचे दुर्लक्ष असल्याने या घटना घडत असल्याचा असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.