मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना लागण झाल्याने त्यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत यासाठी कांदिवलीच्या गणेशनगरमधील त्यांच्या चाहत्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण सुरू केले आहे. महानायक अमिताभ कोरोनातून बरे व्हावेत, अशी प्रार्थना केल्याचे रहिवाशांनी सांगितले. अमिताभ बच्चन लवकर बरे झाले तर यातून लोकांना सकारात्मक संदेश मिळेल, असे आयोजक कमलेश यादव यांनी सांगितले.
काल अमिताभ बच्चन यांना कोरोनासंसर्ग झाल्याचे समजले. स्वत: अमिताभ यांनीच ट्विट करून ही माहिती दिली. या बातमीमुळे त्याचे जगभरातील कोट्यवधी चाहते अस्वस्थ झाले आहेत. ते लवकर ठीक व्हावेत यासाठी अनेक ठिकाणी प्रार्थना केली जात आहे. कांदिवलीतील गणेशनगरमध्ये आज महामृत्युंजय मंत्राचे पठण केले गेले.
77 वर्षीय अमिताभ बच्चन व अभिषेक यांना उपचारासाठी नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, आज ऐश्वर्या आणि आराध्य बच्चन यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बच्चन कुटुंबीयांची सर्व निवासस्थाने महानगरपालिकेने सील केली आहेत.