मुंबई- उत्तर प्रदेशमधील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी नेण्यासाठी अभिनेता सोनू सूद नंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मजुरांसाठी बससेवा सुरू केली आहे. त्यांनी हा उपक्रम माहीम दर्गा ट्रस्ट आणि हाजी अली दर्गा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केला आहे.
शुक्रवारी हाजी अली दर्गा येथून 10 बस सुटल्या. या दोन्ही ट्रस्टच्या नावे असलेले बॅनर आणि अमिताभ यांचे फोटो सर्व बससमोर लावण्यात आले होते.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत बसमधील क्षमतेपेक्षा निम्म्या कामगारांना बसमध्ये बसविण्यात आले होते. सुरक्षितता आणि प्रवासात लागणाऱ्या सोयी यासंबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली. यामध्ये मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 52 आसन क्षमतेच्या बसमध्ये केवळ 25 जण होते. सर्व प्रवासी मजूर असून उत्तर प्रदेशातील लखनऊ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोई या जिल्ह्यांतील आहेत.
अमिताभ बच्चन यांचे कार्यालय दोन महिन्यांपासून मदतकार्यात व्यस्त आहे. एबी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव अमिताभ बच्चन यांच्यावतीने गरजूंना मदत करत आहेत.
दरम्यान, हाजी अली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहब ट्रस्ट, हाजी अली दर्गा, अँटॉप हिल, बाबुलनाथ मंदिर, माहीम दर्गा, धारावी, सायन 90 फीट रोड, अरब गली, कोसला बंदर आणि वरळी कमल यांच्या मदतीने दररोज 4500 हून अधिक फूड पॅकेट्स. वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केली जातात.