मुंबई - ठाकरे घराण्यातील आणखी एक तरुण चेहरा लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे येत्या 23 तारखेला मनसेच्या महाअधिवेशनात अधिकृतपणे राजकारणात जाहीर प्रवेश करणार आहेत. अमित ठाकरे यांना राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राजकारणात सक्रिय असलेले ठाकरे कुटुंबीय इतके वर्षे सत्तेपासून दूर होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवली. सत्ता स्थापनेच्या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.
हेही वाचा : राज ठाकरे हाजिर हो.. १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
आता ठाकरे घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. नेहमी पक्षाच्या कार्यक्रमात हजेरी लावून राज ठाकरे यांची भाषणे ऐकताना अमित ठाकरे अनेकदा दिसले आहेत. आता तरी त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी द्यावी, अशी इच्छा पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली.
हेही वाचा : वंचित समाजाला न्याय देण्यासाठीच आरक्षण - मुख्यमंत्री
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नव वर्षात मनसेचं पहिलचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलंय. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाची नवीन भूमिका जाहीर करणार आहेत. तसेच मनसेचा झेंडा बदलून हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याची माहिती सुत्रांमार्फत मिळत आहे.