मुंबई - अमित शाह यांच्या स्वागताला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ ते सह्याद्री अतिथीगृहापर्यंत 15 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रविवारी 16 एप्रिल रोजी खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सोबतच ते भाजपच्या विविध नेत्यांसोबत बैठका देखील घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आज सह्याद्री अतिथीगृहात बैठका एका बाजूला राज्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत होत आहे. त्यांच्या एकत्रित 'वज्रमुठ' सभा होत आहेत. तर, दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा मनाला जात आहे. मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमित शाह मुंबईत रणनीती आखणार आहेत. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठकही होणार आहे. या बैठकीत विरोधकांच्या भक्कम रणनीतीबाबत प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विजयाचा मंत्र देणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
वज्रमुठ भाजपसमोर डोकेदुखी? महाविकास आघाडीत एकीची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. तर दुसरीकडे राहुल गांधीही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याच बोलले जात आहे. भाजपविरोधातील महाविकास आघाडीची वज्रमुठ तोडण्याचे काम अमित शाह करू शकतात. मुद्द्यांसह निवडणूक जिंकण्यासाठी अमित शाह भाजप नेत्यांना काही नवीन सूचना देण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने इतर राजकीय पक्षांसोबत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याने भाजपला ताकद मिळू शकते.
भाजपचे मिशन 45... भाजपने यावेळी महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी तब्बल 6 जागा एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह लोकसभेच्या सर्व 6 जागा काबीज करण्यावर शाह यांचा अधिक भर असेल. या बैठकीत भाजपच्या नेत्यांसह नव्या मित्रपक्ष शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांनाही निमंत्रित केले जाऊ शकते. मात्र, काही मुद्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा होणे अपेक्षित आहे. अमित शाहांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महाराष्ट्राचे सातत्याने दौरे-अमित शाह यांनी गेल्या तीन महिन्यांत अनेकदा महाराष्ट्राचा दौरा केला आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 19 फेब्रुवारीला कोल्हापुरात होते. मग ते तीन दिवसांच्या दौऱ्यावर नागपुरात आले होते. यावेळी अमित शाह यांच्यासोबत उपमुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्या चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पुणे पोटनिवडणुकीच्या वेळीही अमित शाहा यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान कराआगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 35 पेक्षा जास्त जागा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले. ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. 2024 मध्ये भाजपला सत्तेत आणून ममता दीदींचे सरकार 2025 पूर्वी पाडा, असे त्यांनी जनतेला आवाहन केले. तृणमूलला सत्तेतून हटवण्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे, असल्याचेदेखील शाह यांनी ठासून सांगितले.
हेही वाचा-Amit Shah On Mamata Banerjee : 2024 मध्ये भाजपला 35 जागा द्या, एका वर्षात ममता सरकार पडेल - अमित शाह