मुबंई - 'नाईट लाईफ' शब्दप्रयोग चुकीचा आहे, मुबंई चोवीस तास धावली पाहिजे, हा त्या मागचा उद्देश असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री डॉ. अमित देशमुख यांनी मुंबईतील नाईट लाईफवर बोलताना व्यक्त केले. ते नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईत नाइट लाईफ सुरू करणार, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. यावर प्रश्न विचारला असता बोलताना अमित देशमुख म्हणाले, मुंबईच्या बाबतीत आत्ताच निर्णय घेतला जातोय. मात्र, आधी आपण त्याचा अनुभव आणि प्रतिसाद बघायला हवा. अनेकजण यावर टीका टिप्पणी करत आहेत. मात्र, सध्या याची कुठलीही गरज नाही किंवा आवश्यकताही नाही. आधी प्रतिसाद बघू आणि मग काय बोलायचे ते बोलू असा युक्तिवाद करत देशमुख यांनी नाईटलाईफचे एकप्रकारे समर्थन केले.
ते म्हणाले, लगेच टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. मुबंई चोवीस तास धावली पाहिजे, हा त्या मागचा उद्देश आहे. मुंबई चोवीस तास धावली तर आर्थिक राजधानीला अधिक बळ मिळेल, असेही म्हटले जात आहे.
हेही वाचा - कुर्ल्यात प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक
यासोबत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि 'तान्हाजी' चित्रपटावर सुरू झालेल्या वादावर, छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी यांच्या फोटोचा वापर करून प्रचार केला जात असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी, असा वापर करणे संयुक्तिक नाही असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मुंबईत अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई