मुंबई - रात्री मुसळधार पाऊस पडत होता, अचानक कसलातरी आवाज झाला आणि काही कळायच्या आत आम्ही ढिगाऱ्याखाली गाढलो गेलो. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून आमचे कुटुंबीय या दुर्घटनेतून वाचले, अशी प्रतिक्रिया दुर्घटनेतून बचावलेले अंबालाल जाधव यांनी दिली आहे.
मालाड येथील भिंत ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी सर्वात पहिले घर अंबालाल जाधव यांचे आहे. त्यामुळे जाधव कुटुंब नशिबानेच वाचले, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी आहेत. या जखमींना पालिकेच्या ट्रॉमा केअर, कूपर, शताब्दी, एमव्ही देसाई तसेच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात अंबालाल जाधव यांचे संपूर्ण कुटुंब वाचल्याची चर्चा ऐकून त्याचा मागोवा घेतला असता, नवव्या मजल्यावर अंबालाल जाधव यांचा मुलगा उपचार घेत असल्याचे समजले. त्याची प्रकृती स्थिर असून रुग्णालयाकडून उपचार सुरु आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी अंबालाल जाधव यांच्या कुटुंबातील 5 जण घरात होते. हे पाचही जण या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत.
या दुर्घटनेबाबत अंबालाल जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले, आम्ही झोपलो होतो, घरात पाणी शिरले म्हणून आम्ही जागे झालो. कसला तरी आवाज झाला म्हणून मुलांना घराच्या बाहेर ढकलले. काय होते आहे, हे समजण्याआधीच मी व माझे कुटुंबीय ढिगाऱ्याखाली गाढले गेलो. त्यानंतर जेव्हा आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा आम्ही रुग्णालयात होतो.
माझी बायको, मुलगा, सून आणि नात ढिगाऱ्याखालून कुठून निघाली? आम्हाला ढिगाऱ्याखालून कोणी बाहेर काढले? रुग्णालयात कोणी आणले? याची काहीही माहिती नाही. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून माझे कुटुंब या दुर्घटनेतून वाचले, असे जाधव यांनी सांगितले. या ठिकाणी सुमारे 100 झोपड्या असून 10 ते 15 घरांवर भिंत कोसळल्याचे जाधव यांनी सांगितले.