मुंबई - ऑनलाइन मार्केटिंग कंपनी अॅमेझॉनने मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांच्या विरोधातील दिंडोशी न्यायालयातील तक्रार मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अॅमेझॉन कंपनीने त्यांच्या व्यावसायिक अॅपमध्ये मराठी भाषेचा वापर करावा म्हणून मनसेकडून नो मराठी नो अॅमेझॉन मोहीम राबवत राज्यात अॅमेझॉनला विरोध केला होता. तसेच अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याने अॅमेझॉनकडून मनसे विरोधात दिंडोशी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण-
राज्यात मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे नेहमीच आग्रही आणि आक्रमक राहिली आहे. अॅमेझॉनच्या ऑनलाईन अॅपमध्ये इतर प्रादेशिक भाषांचा समावेश होता. मात्र मराठी भाषेचा समावेश करण्यास कंपनीकडून नकार देण्यात आला होता. यावर मनसेने आक्रमक होत खळ्ळ खट्याकचे धोरण अवलंबले होते. त्यानंतर अॅमेझॉनकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात दिंडोशी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईतील दिंडोशी न्यायालय अॅमेझॉनच्या वतीने दिवाणी प्रकरणात सुनावणी करत आहे. त्यामध्ये न्यायालयाने राज ठाकरे यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, राज ठाकरेंनी न्यायलायत जाणे टाळले.
न्यायलयात अर्ज दाखल-
मनसेच्या मते गेल्या काही दिवसांपासून अॅमेझॉन आणि मनसे यांच्या मध्ये मराठी भाषेचा वापरावरून आणि तक्रारीवरून अनेक बैठका झाल्या आहेत. त्याअंती अॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. मनसेने अॅमेझॉनपुढे मराठी भाषेच्या समावेशसह, राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायायलयात याचिका दाखल केल्याच्या प्रकरणावरून माफी मागण्याचीही अट घालण्यात आली आहे.
मनसेसोबत झालेल्या चर्चेअंती अॅमेझॉनने मंगळवारी दिंडोशी न्यायालयात कंपनी आपली तक्रार मागे घेत असल्याचे पत्र सादर केले त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे.