मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेले केशकर्तनालयं (सलून) उघडण्याची परवानगी आज (रविवार) शासनाने दिली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन राज्यात आजपासून सर्वत्र सलूनची दुकाने उघडण्यात आली आहेत. परंतु, दुकानांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने सलून चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचं सलुनचालकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये आजपासून सलूनची दुकाने उघडण्यात आली. कोरोनाचा संसर्ग पाहता शासनाने लॉकडाऊन केले होते. त्यात सुरुवातीला हॉस्पिटल आणि मेडीकल वगळता सर्व आस्थापना बंद केल्या होत्या. जून महिन्यापासून हळूहळू बाजारपेठ खुली करण्यात आली. परंतु , सलून मात्र उघडायची परवानगी दिली नव्हती. मात्र, आजपासून सलून सुरू झाली आहेत. तीन महिने काम नसल्याने मोठे आर्थिक संकट होते. पण दुकाने खुली केल्याने त्यातून थोडा दिलासा मिळाला आहे. हातावर काम असल्याने तीन महिने घरात बसून कुटुंब सांभाळायची फार मोठी कसरत झाली. त्यात दुकान उघडायचे म्हणून सुरक्षेच्या साधनांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. आता शासनाने दुकान उघडायला परवानगी दिली, पण त्यातही अनेक जाचक घातल्या आहेत.
सलून सकाळीच उघडली आहेत मात्र, काही ठिकाणी ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरवली आहे. तीन महिन्याचे थांबलेले अर्थ चक्र पुन्हा फिरवण्यासाठी थोड्या प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे. परंतु, ते दरही सर्व सामान्यांना परवडणारे असल्याची माहिती सलून चालक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.
ठाणे
ठाण्यातही आजपासून सर्व सलून उघडली आहेत. शिवाय सरकारने घालून दिलेल्या नियमांचे सलूनवाले पालन करत आहेत. तोंडावर मास्क, हातात ग्लोज तर काही ठिकाणी पीपीई कीट घालून सलूनवाले केस कापत होते. तर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हाताला सॅनिटायजर लावूनच दुकानात प्रवेश दिला जात होता.
ग्राहकांच्या तोंडाला मास्क, फेस शिल्ड आणि हातात ग्लोज घातल्याशिवाय ग्राहकाला दुकानात प्रवेश दिला जात नव्हता. एकावेळेस सलूनमध्ये २ ते ३ ग्राहकच घेतले जात होते. शिवाय केस कापताना विशिष्ट अंतर ठेवूनच केस कापले जात होते. प्रत्येक ग्राहकाला वेगळा टॉवेल, प्रत्येक वेळी साहित्य सॅनिटायझ करत आहेत. ग्राहक केस कापून उटल्यावर खुर्ची सॅनिटायझ करण्यात येत आहे. सध्या फक्त केस कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलून सुरु करण्याची परवानगी दिल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, जर सलूनचालक आणि ग्राहकांनी काळजी घेतली नाही तर त्यांना कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबई
मुंबईतही सर्व ठिकाणी सलून उघडण्यात आली आहेत. परंतू छोटेखानी सलून मालक, सलून चालवताना होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे हैराण झाले आहेत. ईटीव्ही भारतने मुंबईतील हिंदमाता भागातील छोटेखानी सलूनला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांनी दुकाने पाणी आणि साबणाने धुऊन आधी सफाई केली. तसेच खुर्च्यांही सॅनिटाइज केल्या आहेत.
सलून मालकाने ईटीव्हीच्या प्रतिनिधींना सांगितले की, सरकारने सलून उघडण्यासाठी जे काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, आम्ही त्यांचे काटेकोरपणे पालन करू. सलून मालकाच्या म्हणण्यानुसार आम्ही डिस्पोजेबल कव्हर मागितले आहेत. आम्ही कोणत्याही ग्राहकांचे केस कापताना हे घालू आणि नंतर ते दूर फेकून देऊ. त्यानंतर, आम्ही ग्राहकांच्या शरीरावर आणखी एक आवरण ठेवणार असल्याचे सलून चालकांनी सांगितले.
छोटेखानी सलून चालवणाऱ्यांचे बजेट कोरोनामुळे चांगलच वाढलं आहे. आधी लॉकडाऊनमुळे तीन महिने दुकाने बंद असल्याने आर्थिक चक्रव्यूहात अडकलेले हे सलूनचालक आता ग्राहकांना परत दुकानात कसे आणायचं या चिंतेत आहेत.
सलूनचे दर हे प्रत्येकी 20 ते 30 रुपयाने वाढले आहेत. लॉकडाऊनआधी जिथे 40 ते 50 रुपये दाढी करण्याचा दर होता तो आता 60 ते 70 रुपयांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊन आधी जीथे 70 ते 80 रुपयात केस कापले जात होते, आता ते दर 100 ते 120 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत