मुंबई- देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे या आजाराची लागन विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आयआयटी मुंबईने २९ मार्चपर्यंत सर्व लेक्चर्स रद्द केले आहेत. त्याचप्रमाणे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याचीही परवानगी दिली आहे.
कोरोना विषाणूमुळे आज राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय यांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने देखील खबरदारी म्हणून २९ मार्चपर्यंत सर्व लेक्चर्स रद्द केले आहेत. आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांना आपल्या घरी जाण्याची परवानगी देखील दिली आहे. परदेशातील विद्यार्थ्यांनी प्रवास न करता वसतिगृहातच रहावे, असे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडण्याआधी त्याची सूचना वसतिगृह प्रमुखाला देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. कॅम्पसमध्ये फक्त पीएचडी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच राहण्याची परवानगी देण्याता आली आहे.
मात्र, या विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूबाबत खूप दक्षता बाळगत आपले संशोधनाचे काम करावे. जे विद्यार्थी संशोधनासाठी किंवा इंटर्नशिपसाठी गेले आहेत, त्यांनी आपल्या घरी किंवा वसतिगृहात परतावे. त्याचप्रमाणे, जे विद्यार्थी किंवा कर्मचारी कोरोना विषाणू प्रभावित देशात गेले आहेत, त्यांना रुग्णालयात तपासणी केल्यानंतरच आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे आआयटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आयआयटी मुंबईमधील सर्व ग्रंथालये बंद करण्यात आली आहेत. तर काही कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयआयटीमध्ये रोज हजर राहावे लागणार असून त्यांनी या विषाणूबाबत नियमित काळजी घ्यावी, असे आवाहन आयआयटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा- अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्तांचे पोलीस आयुक्तांना पत्र