मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अचानक तो रद्द करण्यात आला. कार्यक्रम रद्द झाल्याचा मेसेज येताच पुण्याहून वाशीपर्यंत पोहचलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यू-टर्न घेत पुण्याला गेले.
सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार नसल्याची चर्चा सकाळपासून सुरू झाली होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम देत अजित पवार यांनी पुण्यातील आपले सर्व कार्यक्रम बाजूला करत मुंबईकडे निघाले. मात्र, मधेच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा मेसेज मिळाल्याने वाशीवरूनच आपल्या गाड्यांचा ताफा वळवत त्यांनी पुणे गाठले.
अजित पवार यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे म्हणून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना विनवणी केले होती. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन देत पवारांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम आज रद्द केले होते. मात्र, मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रमांचा आढावा घेतला.
पुण्यामध्ये मागील काही दिवसात कारोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज सकाळीच त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत पालकमंत्री म्हणून त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा स्थानिक अधिकाऱ्यांना दिला.