मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचीदेखील शिवनेरी बंगल्यावर भेट घेतली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, मुलांचे नुकसान होऊ नये आणि साधारण तशाच पद्धतीची भूमिका महाजन यांनीही मान्य केली आहे.
यावेळी महाजन म्हणाले, शासनाची भूमिका स्पष्ट असून आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे आहोत. विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत आहे. नागपूर खंडपीठ आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. तरी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये आचारसंहिताची थोडी अडचण निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या संदर्भात निवडणूक आम्ही निवडणूक आयोगाशी बोलत आहोत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अध्यादेश काढण्याचा विचार चालू आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार आशिष देशमुख यांनीही गिरिश महाजन यांची भेट घेतली आहे.