मुंबई - अंमली पदार्थामुळे तरूण पिढी बर्बाद होत आहे. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे आपला ११वी, १२वी ला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही. आता मुंबई, ठाणे, नागपूर ही शहरे वगळता इतर महाराष्ट्रात देखील अमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर जर रोख लावायचा असेल तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टमार्फत विक्री होत असल्याची लक्षवेधी आज विधानसभेत उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना गृह राज्यमंत्री रणजीत पाटील म्हणाले, की अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करू. मुंबई शहरात स्थापन केलेला स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी दिले. अमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरता मुंबईत पाच स्वंतत्र कक्ष काम करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या कक्षांना मनुष्यबळ आणि निधीची आवश्यकता आहे, तो निधी वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही पाटील म्हणाले.
भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी अमली पदार्थांची 'खिशातली दुकाने' याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. आता अमली पदार्थ रस्त्यावरील अनधिकृत पानटपऱ्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विकले जात आहेत. जनरल स्टोअर्सचे परवाने रद्द करून काहीही होणार नाही, ही खिशातली दुकाने बंद करा, असे अजित पवार म्हणाले. यावर उत्तर देताना रणजीत पाटील यांनी सांगितले, की अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला आता १० ऐवजी २० वर्षांची शिक्षा दिली जात आहे. पूर्वी मॅजिस्ट्रेट समोर या केसेस चालत होत्या. आता जलदगतीने चालाव्यात यासाठी त्या सेशन कोर्टात चालवण्यात येत आहेत. कॉलेज कॅम्पसमध्ये साध्या वेषात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी मनुष्यबळ वाढवले जाईल असे ही ते म्हणाले.
मुंबई शहरात २०१८ साली अमली पदार्थ विरोधी कक्ष आणि मुंबई पोलिसांनी मिळून ९३२३ अमली पदार्थ घेणाऱ्यांवर कारवाई केली. २६९ आरोपींकडून "१० हजार २१ कोटी ७३ लाख २१ हजार ८५३" एवढ्या किमंतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. २०१९ मध्ये आतापर्यंत ६०४७ अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कारवाई केरण्यात आली, तर २४३ आरोपींकडून ५१ कोटी ५६ लाख ३३ हजार ६०५ किमंतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
लहान मुलांनी अंमली पदार्थ सेवन केल्यास पालकांना दोषी ठरवा -
मानखुर्द, गोवंडी परिसरात अंमली पदार्थ विक्रेत्यांनी थैमान घातलेले आहे. या भागात अनेक अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. त्यांची तक्रार केल्यास ते स्वतःला मारून घेतात आणि पोलिसांत उलट तक्रार दाखल करतात. ज्याप्रकारे अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास त्याच्या पालकांना जबाबदार ठरवण्यात येते. त्याप्रमाणे अल्पवयीन मुलाने अंमली पदार्थ सेवन केल्यास त्याच्या पालकांना दोषी ठरवण्यात येणारा कायदा करावा, अशी अजब मागणी अबु आजमी यांनी केली. त्यावर कायद्याच्या निकषांवर तपास करून निर्णय घेऊ असे रणजीत पाटील म्हणाले. या लक्षवेधी दरम्यान अजित पवार, भाजपच्या मनिषा चौधरी, काँग्रेसचे भारत भालके आणि समाजवादी पार्टीच्या अबु आजमी यांनी प्रश्न विचारले.