मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कारण गुलदस्त्यात
नेमक्या कोणत्या कारणामुळे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला याची माहिती मिळाली नाही. अजित पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आले होते. त्यांच्यासह ७० जणांची नावे २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचेही नाव होते. आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार ही बातमी चर्चेत होती. मात्र, पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.
राजीनामा ताबडतोब मंजूर करण्याची पवारांची बागडेंना विनंती
अजित पवार यांनी मला फोन करून ताबडतोब राजीनामा मंजूर करण्याची विनंती केल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले. माझ्या पीएकडे अजित पवारांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर मला फोन करून सांगितल्याचे बागडे म्हणाले.
अजित पवारांचा फोन बंद
अजित पवार यांनी राजनीमा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. अजित पवार राजीनामा देऊन नॉटरिचेबल आहेत.
पक्षात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत - काकडे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याची माहिती प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. अद्याप अजित पवार यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही.
: