मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेचे नेते या यात्रेत सामील झाले आहे. येत्या १८ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची सभा होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना या सभेला डावल्याण्यात आल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांना याबाबत विचारले असता, कोणतेही निमंत्रण मिळाले नसल्याचे ते म्हणाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा राज्यात नववा दिवस आहे. वाशिममध्ये ही यात्रा मुक्कामी आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवार खासगी कामानिमित्त बाहेर होते. शिर्डीच्या मंथन शिबिरालाही अजितदादा आले नव्हते. दरम्यानच्या राहुल गांधी यांच्या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. येत्या १८ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा होणार आहे.
निमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट केले: या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत तुम्हाला या सभेत बोलवण्यात आले आहे का ? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता, अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच सभेला कोण जाणार याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
सेन्सॉर बोर्ड प्रमाणे सरकारची जबाबदारी: हर हर महादेव सिनेमावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या सिनेमाबाबत मत मांडले. हा सिनेमा संपूर्ण पाहिलेला नाही. त्यातील काही भाग बघितला. यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास मोडतोड करून दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सगळ्यांचा आदर आहे. त्यामुळे मोडतोड करू नका. सेन्सॉरबोर्ड प्रमाणे राज्य सरकारनेची जबाबदारीचे भान ठेवायला हवे, असे अजित पवार म्हणाले.