मुंबई : कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेस पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही कसब्याची जागा मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीत एकमत होणार का? असा प्रश्न आहे. तसेच, मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना एकत्र लढणार का? या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
ठाकरे गटासोबत जाणार : अजित पवार म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली आहे. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे, हे निर्विवाद सत्य आहे. या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडीत असताना मुंबईत बरोबर काम करण्याबाबत सांगितले होते. त्यावेळी त्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता. आता वंचित बहुजन विकास आघाडीसोबत शिवसेनेची युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यामुळे आम्हाला नाराज होण्याचा काहीच प्रश्न नाही. आम्ही ठाकरे गटा सोबत आहोत. येणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरे गटासोबत जाण्याची आमची मानसिकता असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यपालांना ज्यांनी पाठवले ते निर्णय घेतील : शिवसेनेने त्यांच्या मित्रपक्षांना, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सोबत येणाऱ्या घटक पक्षांना सामावून घ्यावे. काँग्रेसने त्यांच्या मित्रपक्षांना सांभाळून घ्यावे. महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भात चर्चा केली जाईल. मात्र, काँग्रेसबद्दल अधीक बोलू शकत नाही. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत युती करणार आहोत. कॉंग्रेसने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशीच परिस्थिती असते, असे पवार यांनी सांगितले आहे. तसेच, राज्यपालांना ज्यांनी पाठवले त्या वरिष्ठांना कोणता निर्णय घ्यायचा तो त्यांचे वरिष्ठ घेतील असे पवार म्हणाले आहेत.
निवडणूक कार्यक्रम कसा? : निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, 31 जानेवारी 2023 रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.
07 फेब्रुवारी 2023 पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल.
08 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
10 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची तारीख असेल.
27 फेब्रुवारी 2023 रोजी या जागांसाठीचं मतदान पार पडेल.
02 मार्च रोजी मतमोजणी होईल.
हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकार संविधानिक आहे का, राज्यपालांनी खुलासा करण्याची राष्ट्रवादीची मागणी