मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल अद्याप वाजलेला नसताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढण्यावर सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे यांनीदेखील यासाठी हिरवा कंदील दिला आहे. परंतु, युती-आघाडीचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
ठाकरे गट राष्ट्रवादी एकत्र : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन कट्टर विरोधक असलेल्या पक्षांनी एकत्र येत, भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. आता मुंबई मनपातील भाजपचे मनसुबे उधळून लावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
एकत्र लढण्याचा प्रस्ताव : विरोधीपक्षनेते अजित पवार पुढे म्हणाले की, मुंबईत शिवसेनेची ताकद मोठी आहे. आगामी निवडणूक युती किंवा आघाडीत लढण्याचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. ठाकरेंनी निवडणूक आल्यावर निर्णय घेऊ, असा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, युती किंवा आघाडी करणार यावर ठोस निर्णय झाला नव्हता. तो प्रलंबित असून येत्या निवडणुकीपूर्वी त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे पवार यांनी सांगितले.
पवारांचा महापालिकेला सवाल : आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपाच्या रस्ता गैरप्रकारांबाबत केलेल्या आरोपाबाबत अजित पवार यांना विचारण्यात आले असता, पाठराखण करताना पवार यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपात शंभर टक्के तथ्य आहे. मुंबईवर प्रशासक आहे. प्रशासक व नगरविकास खात्याची वस्तुस्थिती काय आहे, याचे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यावर आयुक्त आणि त्यांच्या टीमचे काय म्हणणे आहे. हे राज्याला व मुंबईकरांना कळायला हवे, असे पवार यांनी सांगितले. मुंबईत रस्त्यांची जी कामे सुरू आहेत त्यामध्ये प्रति किलोमीटर काय खर्च येतो. मुंबई हे शहर सात बेटांवर वसलेले आहे. सर्व्हिस देणार्या ४० प्रकारच्या बाबी यात आहेत. त्या जमिनीखालून चालतात, त्यामुळे ताबडतोब कामे होऊ शकणार नाहीत. त्याला काही काळ लागणार आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर स्पष्टीकरण : अजित पवार पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात, हे कळायला मार्ग नाही. आमचे नेते शरद पवार यांनी ओपनमधून प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना निवडून आणण्याचे काम केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमध्ये आठवले यांना निवडून आणले होते. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरीष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्य करत असतात तो त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्ही कुणाशीही तसे वागत नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर अजित पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपने कसली कंबर : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्ता असलेल्या शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीचा आणि हिंदुत्वाची कास धरलेल्या मनसेसोबत भाजप युती करण्याची जोरदार चर्चा रंगली होती. संभाव्य युतीमुळे आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल, असे सांगण्यात आले. इतर पक्षांकडून ही मुंबई मनपासाठी रणनीती आखली जात आहे.
हेही वाचा : Cyrus Mistry: सायरस मिस्त्री अपघात प्रकरण! याचिका फेटाळत याचिकाकर्त्यालाही दंड