मुंबई Air Hostess Death Case : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सोसायटीत राहणाऱ्या 24 वर्षीय रुपल आग्रे एअर हॉस्टेसची 3 सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. हत्या करणाऱ्या आरोपीला पवई पोलिसांनी अवघ्या आठ तासात अटक केली होती. मात्र, आरोपी विक्रम अटवाल (वय 35) यानं पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचं आज सकाळी 6.30 च्या सुमारास उघडकीस आलं.
वादातूनच रुपलची हत्या : आरोपीचा मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून तेथे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, एअर होस्टेसची हत्या करणारा विक्रम अटवाल याच इमारतीत घरकाम करत होता. त्याचा रुपलसोबत सतत वाद होत होता. या वादातूनच त्यानं रुपलची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर त्याला अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्या केलीय.
बाथरूममध्ये आत्महत्या : पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या पवई हत्याकांडातील आरोपीनं लॉकअपमध्ये आत्महत्या केली. आरोपी विठ्ठल अटवाल याच्यावर पवई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विक्रम अटवाल यानं सकाळी 6.45 ते 07.30 च्या दरम्यान बाथरूममध्ये आत्महत्या केली.
काय आहे प्रकरण : रुपल आग्रे 24 वर्षीय एअर होस्टेसची रविवारी (4 सप्टेंबर) मुंबईतील राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 12 तासांत याच इमारतीत काम करणाऱ्या सफाई कामगाराला अटक करून गुन्हा दाखल केला होता. आरोपीही पवईचा रहिवासी आहे. त्याची पत्नीही या इमारतीत साफसफाइचं काम करते. पवई पोलिसांनी विक्रम अटवालविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. एअर हॉस्टेस रूपल ओग्रेय (वय 24) मुळची छत्तीसगड येथील रहिवाशी होती.
आत्महत्येनंतर पोलीस ठाण्याचं गेट बंद : अंधेरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आरोपीनं आत्महत्या केल्यानं अंधेरी पोलीस ठाण्याचं गेट बंद करण्यात आलं. पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त परमवीर सिंग दहिया, परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे अंधेरी पोलीस ठाण्यात हजर होते. आरोपीच्या आत्महत्येमुळं मुंबई पोलिसांच्या लॉकअपबाबत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकअपमधील आरोपींसाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. मात्र, आरोपीच्या आत्महत्येमुळं अंधेरी पोलिसांनी पोलीस ठाण्याचं गेट बंद केल्यानं तक्रारदारांना त्रास सहन करावाल लागतोय.
हेही वाचा -