मुंबई - राज्यात ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्या गेल्या नाहीत, त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या लाखो गरजू शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या, एनडीआरएफच्या सहकार्याने मदत केली जाईल, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली. ते गुरूवारी विधान परिषदेत बोलत होते.
राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत देण्याच्या विषयावर रामहरी रूपनवर, डॉ. परिणय फुके आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं की, 'राज्यात ४७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यातला राज्य सरकारचा १९७१ कोटींपैकी १७१७ कोटींचा वाटा सरकारने दिला आहे. पीक विम्यांच्या निकषांप्रमाणे १२ लाख २८ हजार शेतकऱ्यांना ३४४ कोटी ८७ लाख विम्यांची रक्कम देण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सात लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे ४९८ कोटींचे वाटप झाले आहे.'
राज्यातल्या १० जिल्ह्यांमध्ये सहा वेळा निविदा मागवूनही एकही विमा कंपनी येथे आली नाही. अशा जिल्ह्यातल्या गरजू शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या सहकार्याने त्यांच्या निकषानुसार मदत केली जाईल, असेही भुसे यांनी सांगितलं. यावेळी विनायक मेटे, डॉ. रणजित पाटील आदींनी उपप्रश्न विचारले.