मुंबई - फ्रान्समध्ये पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून विद्यार्थ्यांना दाखवणाऱ्या एका शिक्षकाची हत्या करण्यात आली. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी यावर इस्लामिक दहशतवाद असे वक्तव्य केले. राष्ट्रपतींच्या या विधानावर अनेक मुस्लीम देशांनी आक्षेप घेतला आहे. मॅक्रोन यांच्या विरोधात आज मुंबईतील भेंडी बाजार येथे रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
आठवडाभरापूर्वी फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना समोर आली. विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रे दाखवून त्याविषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय चेनेन या संशयित आरोपीस गोळ्या झाडून ठार केले. यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद असे सांगत ‘इस्लाम आपले भविष्य हिरावून घेण्याच्या विचारात आहे, मात्र हे कधीच होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया नोंदवली. यानंतर इस्लामिक देश आणि फ्रान्स यांच्यामधील वाद वाढत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. नंतर मॅक्रॉन यांनी महंमद पैगंबरांच्या व्यंगचित्रांवर बंदी घालण्यात येणार नसल्याचेही देखील स्पष्ट केले. मात्र, तरीही त्यांचा विरोध काही मुस्लीम संघटनांनी करणे थांबवलेले नाही.
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी जगाची माफी मागावी
राष्ट्रपतींच्या या वादग्रस्त विधानावर अनेक मुस्लीम देशांनी आक्षेप घेतला. जगात अनेक ठिकाणी मुस्लीम संघटनांकडून फ्रान्सचा बहिष्कार करण्यावरून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यात आज मुंबईतदेखील मुस्लीम संघटना रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत फ्रान्सविरोधात घोषणा देत विरोध केला. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी जगाची माफी मागावी, अशी मागणी यावेळी मौलाना यांनी केली.